Saturday, 10 June 2017

वायफळ गोष्टी

वायफळ गोष्टी (भाग १)

एका फणसाची गोष्ट 
नुकतीच थंडी संपून उन्हाळा सुरु झालेला असतो. वाडीतल्या फणसाच्या झाडाला एक कुयरी लागते. आणि दिसामाशी वाढू लागली. हा फणस अगदीच बोल घेवढा होता. दिवस रात्र बडबड करीत असे. पण मनाने अगदीच साधा भोळा, डोक्यावर विरळ केस, तोंडातले दात फेंदारून बाहेर आलेले. आणि जिभेचा पट्टा सुरु. त्या झाडाबाजूलाच एक आंब्याचं झाड होता. शांन्त. घरंदाज, मोजकं बोलणार. 
एक दिवस दिनू बाळाने तो फणस काढून एक पायरी ठेवला पण जरा आडोश्याला, पटकन दिसणार नाही असा आणि त्याच्या बाजूला आंबा ठेवला. झाल, सुरु झाली फणसाची बडबड. आंब्याचं तर डोकं उठल,. याची गोष्ट आपली सुरु. "बर  का!! तुला म्हणून सांगतो, सांगू नको कुठे बर का !!!" या फणसाला सारखी सारखी "बर्र  का " " बरं का" म्हणायची सवय. त्याच्या वायफळ बडबडीने आंबा चांगलाच गरम झाला,
लाल बुंद  झाला, आणि एवढा पकाला, एवढा पकाला की पिकून गेला, आंब्याला आला राग कारण तो असा prematurely पि(प)कला होता ना...!!फणसाच्या बडबडीने
तो भडकून म्हणाला "ए हे बघ, तुझ्या फालतू बडीबडीने आधीच खूप पकलोय, मी तुला शाप देतो कि हा माणूस तुला कापून खाईल आणि सारखं सारखं काय रे "बरं का, बरं का!!" जा ...... तुझं  नाव आज पासून 'बरका'" 

आणि अशाप्रकारे त्या दिवसापासून काही फणस गप्प झाले आणि कापले गेले (म्हणून कापा) आणि काही बरके राहिले. 


तळ टीप: अतिशय भिक्कार अशी कंमेंट करू नये

Monday, 29 February 2016

Lonely Traveler

Lonely Travelkar
खांदेरी
              माणूस बऱ्याच  वेळेला ज्या आंतरीक उर्मीने गोष्टी करायला घेतो, त्यातच हा प्रकार मोडतो. माणूस सामाजिक प्राणी आहे वगैरे सगळं असलं तरी, "एकट्याने" प्रवास करण्याच्या थ्रील पासून तो स्वःताला वंचित ठेऊ शकला नाहीये. या आंतरिक उर्मीच्या जोरावर मानवाने बऱ्याच गोष्टी केल्या, आणि करत राहील. बरीच उदाहरण देता येतील, पूर्वीच्या काळी क्षितिजच boundary  मानली जायची, "त्यापल्याड  काय?" हा प्रश्न नेहमीच भंडावणारा होता. आता हा प्रश्न एवढा मोठा झालाय की  "आपण या विश्वात एकटेच आहोत का?"  हे शोधतोय. तर, माणसाला नेहमीच एकटेपणाबद्दल एक सुप्त आकर्षण आणि भीती दोन्ही वाटत आलं आहे. Martian movies च उदाहरण घ्या ना. असो, मी काही उद्दात गोष्टींसाठी वैगेरे फिरतो असं मुळीच नाही, कोलाहला पासून दूर जावसं  वाटत किंव्हा If I want to put as my one of the friends said it would be: "अंजानी राहो पे, सत्य की  खोज मे". पण एक आहे! एकटा प्रवास खूप काही देऊन जातो. मुंबैकराचा एकटा लोकल प्रवास यात कौंट होतं  नाही. 

                नमनाला घडा भर तेल झालय. आता मुद्द्याला हात घालतो. गेले काही दिवस मनात खांदेरी-उंदेरी घोळत होते, म्हंटल यावेळी स्वारी करूच. याआधी ३ वर्षांपूर्वी औरंगाबाद असच  फिरून झाल होतं, त्या वेळच्या बऱ्याच आठवणी आजही ताज्या आहेत. सांगेन कधी तरी त्यापण.  एक दिवस आधी ठरलं उद्या खांदेरी उंदेरी, रात्री backpack  तयार केली, आणि घरात announce केलं.  

              हे किल्ले थळच्या किनाऱ्यापासून जवळ आहेत. या बेटांची पाहणी जवळपास ३००० शिवसैनिकांनी (शिवसेना नव्हे) नोव्हेंबर १६७० साली केली. पुढे ८ वर्षांनी महाराजांनी खांदेरीचा पाया घातला. आणि सुरु झाली एक झुंज, किल्ला बांधकाम रोकण्याचे सारे प्रयत्न इंग्रज आणि सिद्दीने केले. हा एकमेव किल्ला असा आहे की तो भर जलयुद्धात बांधला गेला आणि बांधता-बांधता लढवला गेला. दिवस-रात्रीच्या वाऱ्याची सखोल माहिती, भरती-ओहोटी प्रमाणे काटेकोर नियोजन, निधडी छाती आणि मनगटी जोरावर १९७८ ते १९७९ मध्ये ३ लढाया जिंकल्या आणि ब्रिटिशाना गुढघ्यावर आणलं. त्याचं झालं असं की पोर्तुगीज कन्येशी झालेल्या विवाहामध्ये ब्रिटिशाना मुंबई बेटे आंदण म्हणून मिळाली होती, आणि त्यांनी आसपास ची सगळीच  जमीन मिळाली असा गोड गैरसमज करून घेतला. हे म्हणजे एकाच घर दुसऱ्याने तिसऱ्याला परस्पर विकाण्यासारख आहे. आरमारच्या दृष्टीने खांदेरी ठिकाण अतिशय मोक्याच होतं. मुंबई पासून जवळ म्हणजे ब्रिटिशाना डोकेदुखी आणि स्वराज्यासाठी first line of  defense in naval war. या नंतर कोलाबा किल्ला, जंजिरा करत करत तळकोकणात सिंधुदुर्ग जो पोर्तुगीजांना शह होता. This fortified the bay of "Swaraj" like  a "String of Pearls". या strategy ची सुरवात स्वराज रक्षणासाठी त्याकाळी सुरु झाली, आणि हाच फास आता चीन आपल्या भोवती टाकत होता, भारत भूमीचं सुदैव म्हणा किंव्हा लवकर आलेल शहाणापण म्हणा, हा फास तोडायची यशस्वी सुरवात आपण  केली. 
                 या जलदुर्ग वर जाण्यासाठी थळला बसने नाही तर जलमार्गाने पोहचता येत. तेथून मात्र होडीच करावी लागते. मुंबई-मांडवा समुद्रमार्गे प्रवास मग थळ नाक्याला उतरून थळ बंदरावर पोचण्याचा प्लान होता.  जास्तीत जास्त ४ तास लागतील असा हिशोब होता पण "प्लान के मुताबिक" सगळ झालंय अस फार कमी वेळेला होतं. त्याचं  झालं अस की सकाळी Gate of India ला पोहचलो (हल्ली मला हा भाग अजिबात आवडत नाही, काही असांगेबल कारण आहेत). १ तास लाईनीत तिष्ठत राहिल्यावर १ तास नंतरच तिकीट मिळालं. मालदारच्या  बोटीत प्रवास सुरु झाला आणि सोबतीला असंख्य समुद्री पक्षी (Sea Gulls). त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न प्रवासी मंडळीनी सोडवला. कुरकुरे, चिप्स, ब्रेड यांच्या चवीला चांगलेच चाटवले होते, प्रवासी नाही पक्षी. 
वाटेत निरनिराळी जहाज, बोटी आणि हो एक रिग लागली. तेवढ्यात कोणी विद्वानाने आपल्या किरकिऱ्या  मुलाला ते बोट स्टेशन आहे म्हणून सांगितलं. 


 कुरकुरे 

लंगडा त्यागी  



आजूबाजूच्या कोलाहलातून माझ्या कानावर अस  काहीसं  पडलं "अग ऐकलस का ! मांडव्याला उतरून बससाठी लाईन पटकन लावावी लागेल", हम्म एक नवीन माहिती कळली. लगेच ती पुढे प्रत्यक्षात आणली आणि विंडो सीट पकडली. "अहो" आणि "अग" ला मात्र पुढच्या बस साठी थांबाव लागलं.
         थळ  नाक्याला उतरून बंदरापर्यंत रिक्क्षा केली. आणि कळलं की माझी खांदेरीला जाणारी बोट चुकालीये. घरातन बाहेर पडल्यावर मला एका गोष्टीची भीती असते, गाडी-घोडे चुकल्यामुळे, एवढ्या दूर येऊन प्लानचा फियास्को होण्याची. पण त्या ठिकाणी अडकून राहण्याची भीती मला कधीच वाटली नाही (हम्म !!! Strange!!!). बंदरावर  सुस्तीच होती, मासे एका बाजूला वाळत पडले होते. तेवढ्यात २-४ किंगफिशर कर्कश ओरडत गेले. बाकी सगळं  सामसूम होतं. "खांदेरीला जायला पुढची बोट कधी आहे?" मी विचारलं, "किती जण आहात?" एक वृद्ध नावाड्याने प्रश्नास प्रश्न केला. मी पण मागे-पुढे वळून बघितलं, मी तर एकटाच होतो म्हंटल "एकटाच". " एकट्यासाठी होडी?" नकारार्थी मान  हलवली, "कुठून आलात?", अतिशय निरर्थक प्रश्न, कुठूनीही का असो, होडी तर नाहीच्चे ना. मी पण निराशाने उत्तर दिलं कल्याण. "हम्म" म्हातारा डोलावला "अस्स कर, थोडा वेळ थांब. माझ्या होडीतून माल घेऊन जायचय खांदेरी वर, १५ मिनटानी निघु". मी पण खुशीत, होडीत जाऊन बसलो. १५ ची चांगली ४० मिनिटे झाली, तरी चिन्ह दिसेनात. थोडा वेळ गप्पा मारल्या, तेवढ्यात बाजूच्या बोटीवर ढीगचीक ढीगचाक आवाज यायला लागले. तशी म्हातारबाबा करवादले "ही पोरं व्यसनं करतात, अपल्यालबा एक व्यसन नाही, वय ७५, अजून मजबूत है" अस  म्हणत तोंडातली विडी फेकली आणि शांतपणे  नवीन शिलगावली. सफेद (?) रंगाची पैरण, गूढघ्यावर येऊ पाहणार धोतरं, कपाळावर वारकरी गंध आणि तोंडात अतिशय ऐटीत ठेवलेली तिरकी विडी (Typically showing his Swag). तेवढ्यात सामानाचा ट्रक आला. पोरे लोकांनी सामान लादायला सुरवात केली. सगळा माल लादून झाल्यावर लक्षात आलं की  जेवणाचे डबे आणि पाणी मागेच राहिलंय. झालं २ जण  माघारी फिरले, तेवढ्यात बाबा गायब झाले. मला तिन्ही सांज दिसायला लागली डोळ्यापुढे काय कराव कळेना. बाबांच्या होडीचा क्लीनर बरोबर होता, त्याच्याशी बोलून काही मिळतंय का बघू लागलो. त्याची उत्तर काही कळेनात, तेवढ्यात बाजूच्या घरातन आवाज आला "त्यो ठार भैरा हाई". थोडा वेळ त्याचे इशारे समजण्यात गेले तेवढ्यावरन एवढंच कळल की म्हातारबा पण डब्बा आणायला गेलेत. बारा वाजत आले होते, पण १५ मिनट काही संपेनात. गावाकडचा अनुभव पहिला नसल्याने, १५ मिनट मी मनात पाऊण तास म्हणूनच पकडले होते. फावल्यावेळात आसपास काम करत असलेल्या मावश्यां-काकूंना काही फिश डिशेस कशा करतात विचारल, "मांदेली कशी करतात" विचारलं, मांदेली वरच एवढं  प्रेम बघून, एक मावशी मांदेली देऊ करत होती, "घे र, एवढी पडलीये इथ" एका माश्यांच्या राशीकडे बोट दाखवत म्हणाली. मी मासे खात नाही ऐकून प्रश्नार्थक नजरने बघितल,इतक्यात म्हातारबा दोघांना घेऊन आले, मी पण निरोप घेतला आणि एकदाची होडी सुटली. 


Swag बाबा 

(क्रमश:)







Sunday, 10 January 2016

डोंबिवली खाडीप्रदेश 

         आज गेली कित्येक वर्ष डोंबिवलीमध्ये राहतोय, पण इतकी जैव विविधता असेल असं  वाटलं  नव्हतं माणसांची नाही बर का, पक्ष्यांची. (माणसं काय इथून तिथून सारखीच). यावेळी उद्युक्त केल फोटोग्राफर विवेक भणगे यांनी. मी माझा नादुरुस्त कॅमेरा घेऊन गेलो त्यांच्याकडे. आणि आमचा नेहमीचा संवाद सुरु झाला.  "लेका … !! आहेस कुठे" , "तू फोटो काढ, मला नको दाखवूस " एवढा बोलून त्यांनी त्यांच्या कडचे फोटो दाखवले. "चल जाऊ कुठे तरी पक्षी बघायला" त्यांनी नेहमीची गळ घातली, मी पण पहिल्या फटक्यातच  म्हणालो "चला उद्याच जाऊ", माझ्या अनपेक्षित उत्तराने जरा बावचळले, पण एकदम खुश झाले. मी म्हटलं  मी पक्षी ओळखेन तुम्ही शूट करा , मी spotter  आणि तुम्ही sniper  अशी विभागणी झाली. सकाळी ७ वाजता कोपरला भेटण्याच ठरलं, माझी सायकल आणि त्यांची बाईक, ठरलं तर मग... सकाळी ७ वाजता जुन्या डोंबिवलीची खाडी. मला एक वाईट सवय आहे, अश्या वेळी ५ मिनिट लवकरच पोहचण्याची. बराच वेळ झाला, माझा भांडूपचा अनुभव गाठीशी असल्याने मला एकूणच अंदाज आला. नंतर असही  वाटलं की  त्यांना कदाचित माझा भरवसा नसावा. इतक्यातच फोन आला "येतोय". एव्हाना मी पोचलो होतो. रविवार सकाळ  होती, डोम्बिवलीकर मोर्निंग walk  ला झुंडीने आले होते. एव्हाना मी कपाळावर हात मारावा इतकी गर्दी झाली होती. झालं कल्याण!! आता कसले पक्षी दिसतायत. विचारातच खाडीवरच्या घाटावर बसलो. आसपास बिअरच्या बाटल्यांचा खच, अर्धवट खाऊन टाकलेला चकना, शेकोटी पेटवता येईल इतकी सिगारेटची थोटकी आणि प्लास्टिक पिशव्या एवढ्या की त्या निसर्गाचा एक भाग वाटाव्यात. "सुसंस्कृत डोंबिवली"ची शोभा होईल असचं एकूण चित्र, "स्वछ भारत" ची एक पंचवार्षिक योजना सहज कामी  येईल. माणसाची मन स्वछ करायची सोय असती तर किती बर्र झाल असतं. असो. 
         एव्हाना माझे फोटोग्राफर मित्र आले होते. त्यांनी माझ्यासाठी एक्स्ट्रा कॅमेरा आणला होता. पुन्हा एकदा "नयनरम्य" परिसर डोळ्याखालून घातला. खाडी शहराच्या पश्चिम टोकाला, उगवता सुर्य मागच्या बाजूला आणि समोर पाणथळ भूभाग, फोटोग्राफी साठी उत्तम सकाळ होती. Spot  billed  duck  चा एक थवा मोठ्या डबक्या कडे जाताना दिसत होता, एक पाण कावळा पंख पसरून उन्हात वाळवत होता. एक stork आणि काही greater  egrets जाताना दिसले, दोन पाच मुनियांचे थवे दिसले.  राखाडी वटवट्या (Ashy Prinia and Plain  Prinia) फांदी वर झोपाळे घेत शीळ घालत होता . 
          बदकं बघण्यासाठी डबक्याकडे जायला निघालो, तशी आमच्या चाहुलीने तो अख्खा थवा भुर्र झाला. २ ३ जागा हुडकून बघितल्या पण दारूच्या बाटल्या आणि सिगारेटी या शिवाय काहीच दिसल नाही. माझे हे मित्र या आधी दोन-तीनदा येउन गेले होते. त्यांनी सुचवलेल्या जागी जायचं ठरलं. वाटेत ४  ५ टीम क्रिकेट खेळत होत्या. अशा ठिकाणी काय दिसणार याच चिंतेत होतो. पण एक कळून चुकलं होतं ही माणस आपल्या आजूबाजूच्या परिसराविषयी अत्यंत बेफिकीर आहेत. यांच्या दुनियेत फक्त २ प्रकारचे पक्षी आहेत, एक कावळा आणि दुसरी चिमणी आणि उरलेले पोपट, मैना वैगेरे.  
        रस्त्याकडेलगत मला एक कोतवाल  (Drongo) दिसला, अत्यंत धीट निघालं ते कार्ट, मी फक्त ६ फूट दूर होतो, हा भाई आरामत बसलेला. एखाद्या model  प्रमाणे सगळ्या angle  ने फोटो काढून घेतले त्याने. येणारे जाणारे "अरे तो कावळा आहे" "काय बावळट  माणूस आहे, कावळ्याचे फोटो काढतोय" अश्या अविर्भावात होते. जिकडे ही मुलं (२५-२६ वर्षाची मुलं ??) क्रिकेट खेळत होती तिकडेच मुनियांचा एक थवा येउन बसला. १५-२० मुनिया सहज असतील, त्यात होत्या काही लाल मुनिया (red adavat). माणसाच्या दुर्लाक्षपणाने का होईना, पण आमच्या वावराला  त्या धिटावल्या होत्या, मस्त फोटो काढता आले. 
         आम्ही ठरलेल्या ठिकाणाकडे जायला निघालो. वाटेत टिटविंच्या (red wattled lapwing) जोड्या दिसल्या, त्या कावळ्यांशी भांडत होत्या. या कावळ्यांनी जगाशी वैर घेतलेलं आहे, म्हणूनच कोकिळेला समस्त पक्ष्यांचा छुपा पाठींबा असावा. जुन्या काळी पावसाचा अंदाज टिटवी अंडी कुठे घालते यावरून काढला जाई. जर उंच पठारावर अंडी असतील तर त्या वर्षी पाऊस चांगला होईल अस भाकीत असे. हल्ली आपण सगळंच सपाट केलंय त्यामुळे अंडी सारखी सखल भागात, म्हणूनच कदाचित पाऊस कमी होत असावा. टिटवीच्या जोडी बरोबर एक पिवळा धोबी पक्षी हिंडत होता (Yellow Wagtail). शेवटी एका ठिकाणी थांबून ज्या पक्ष्यासाठी एवढी तगमग केली होती त्याची वाट पाहत थांबलो. त्यानेही फार वेळ वाट पाह्यला लावलं  नाही. आमच्या समोर एक चिमणीच्या आकाराचा प्रवासी पक्षी येउन बसला. गळ्याभोवती सुंदर निळ्या आणि ब्राऊन रंगांची ३-४ कडी. मराठी मालिकेच्या भाषेत सांगायचं  झालं  तर "जानव्ही टाइप मंगळसूत्र" होत निळ्या आणि ब्राऊन रंगाचं. हे बेन पण फार धिटावलेलं. या पक्ष्याचं मराठी नाव "शंकर" आहे असं एका ठिकाणी वाचलंय, हे कितीपत खरं आहे ते शंकरालाच माहीत. हा जीव पश्चिम अलास्कातून येतो. अशा फारिन पक्ष्याचे पाय माझ्या डोंबिवलीला लागले. धन्य ती डोंबिवली. 
            परतीच्या वाटेवर एका ठिकाणी डबक्यात  मोठे बगळे न्याहारी करण्यात गर्क होते. आणि आज त्यांच्या कडे एक पाहुणा आला होता. तो होता आजवर चित्तमपल्लीन्च्या फक्त पुस्तकात वाचलेला शेराटी.  पण हा होता छोटा शेराटी/ चिमणा कुदळ्या  (Glossy ibis). हा पक्षी उडताना फार सुंदर आणि ग्रेसफुल दिसतो म्हणे, पण म्हणून त्याला उडवून लावलं नाही बर का .  पाणथळ प्रदेशातील पक्षांची यादी ज्यांच्या नावावाचून अपूर्ण राहील असे ढोकरी (Pond heron), तुतवार (Sandpiper) दिसले आणि दिवस संपन्न झाला. घरी पोचेस्तोवर १० वाजले होते. आईने माझे बारा वाजवायच्या आत अंघोळ केलेली बरी. 
           एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या सगळ्या जमिनीवर आधीच छोटे छोटे भूखंड concrete ने  विभागलेले आहेत. ही जमीन कोणाच्या मालकीची आहे माहित नाही. पण लवकरच ती जाईल. आणि अनभिन्य डोम्बिवलीकर या पक्षी संपत्तीला मुकेल अशी भीती उगाचच मला वाटली. असो.  असं  काही तरी होतं याची निदान माझ्या लेखी तरी नोंद झाली.



फोटो सौजन्य: श्री विवेक भणगे (अस्वाम फोटोज्,डोंबिवली)
छोटा शेराटी/ चिमणा कुदळ्या  (Glossy ibis)
Yellow Wagtail
Yellow Wagtail
Blue throat (शंकर)
Plain prinia
Ashy prinia
Blue throat
Blue throat

छोटा शेराटी/ चिमणा कुदळ्या  (Glossy ibis)




Red adavat

Red adavat and Munia
फोटो सौजन्य: श्री विवेक भणगे (अस्वाम फोटोज्)

Sunday, 27 December 2015

Bhandup pumping station

भांडूप उदंचन केंद्र
या नावातून काहीहीही अर्थबोध लागत नाही, पण हे नाव पक्षी प्रेमीच्या ओळखीच आहे (काहीस). या भागातले काही पक्षी आणि त्यांची नावं  यांचा धांडोळा घ्यायचा हा छोटा प्रयत्न (किती अदबशीर असाव माणसाने).

एक गमतीदार बाब म्हणजे इथे पोहोचण्यासाठी  भांडुपला न उतरता नाहूरला उताराव लागतं आणि तेथून Google  map वर "इथे कोपऱ्यावर तर आहे" असा दिसणार हे ठिकाण बऱ्यापैकी  लांब आहे. त्यामुळे ज्यांना सकाळी लवकर उठून पक्षी बघण्या साठी पायी जायची इच्छा (खाज) असेल, त्यासाठी हे अंतर निश्चितच मेजवानी आहे. highway  वर आपल्या कडे निरनिराळ्या नजरेने बघणारे मिळतात, (जणूकाही पायी चालणारा माणूस पाहिल्यांदा  पाहावा), वाटेत एक बस stand आहे, तिथली वैतागलेली माणस "हा वेडा  एकटा  चालत का आणि कुठे जातोय" अशा नजरन बघत असतात. एक मात्र नक्की की  चालताना एकांत मिळतो, मजा येते.  पक्षांचे थवे पण त्याच दिशेला उडताना दिसतात, खात्री पटते कि चाल्लोय ती दिशा बरोबर आहे. highway  ओलांडून आत शिरल्या वर रस्त्याच्या एका बाजूस मिठाघर आणि दुसर्या बाजूस, उदंचन केंद्राची जमीन. दोन्ही भूभाग सखल, दलदलीचा, पाणथळ आणि काही प्रमाणात तीवर  आणि झाडाझुडपाने आच्छादलेला. आतल्या बाजूस अर्धा एक किलोमीटर चालल्यावर, एक कौलारू घर आणि त्या समोरील एक काळा कुत्रा आपला स्वागत करतो. हा कुत्रा माझ्या दर भेटीला भुंकून भुंकून हैराण होतो बिचारा. तिथून लगेच डाव्या बाजूला वळून पुढे गेल्यावर सुरु होतं हे क्षेत्र. तिथला रस्ता (एकमेव) मुख्यत्वे दोन कारणांमुळे अजून बर्यापैकी शाबूत अहे. १. तिथे रहदारी फार कमी आणि २. तो रस्ता महानगर पालिका सांभाळीत नाही. 
एका बाजूला म्युन्सिपाल्टी गटाराच पाणी ढवळते आणि दुसऱ्या  बाजूला निसर्ग त्या चिखलमधे  आपलं  कार्य अविश्रांत करत असतो. (हे वाक्य बऱ्याच  लोकांच्या मनातल्या "निसर्ग" च्या भावनेला तडा देणारं  आहे नै). हो पण तिथे होणाऱ्या या चिखलमुळे  तिथे एक पूर्ण ecosystem develop  झालीये. आणि त्यातूनच "हिरवा निसर्ग हा भवतीने" वैगेरे निर्माण झाला आहे. आज वरच्या प्रत्येक भेटीत वेगवेगळे पक्षी (आणि तोच कुत्रा) दिसले. 

आजपर्यंत बऱ्याच वेळेला गेलोय, पण माझा पहिला अनुभव सही होता (किंबहुना ते सही असतात म्हणूनच पहिले असतात). माझ्या मित्रांनी त्यांच्या "मित्र" पणाला स्मरून आयत्यावेळेला टांग  दिली आणि माझी पहिली भेट घडली. Whatsapp  ठरल्यानुसार मी भल्या पहाटे ६ वाजता नाहुरला (आमच्यापैकी काहींसाठी ६ म्हंजे  साखरझोपेची वेळ) एकटाच अजागळासारखा हजर!! म्हटलं  थोडं  पुढे होऊया येतील मागाहून, असं  म्हणत म्हणत मी, अर्ध्याहून अधिक पोहचलो होतो. पण नक्की वाट माहित नसल्यामुळे, बराचवेळ मिठाघरांशीच रेंगाळलो  होतो. तिथे उगाच फालतू फोटो काढ, उडणारा कावळा बघ वैगेरे प्रकार चालू असताना एक गाडीवाला आला आणि तोही बिचारा मी जिकडे बघेन तिकडे बघत होता. त्याने शक्य तितक्या नम्र स्वरात विचारलं "हेच का ते ठिकाण?" मी पण माझ्या सात पिढ्या पक्षी बघण्यात गेल्या अशा अविर्भावात शक्य तेवढ्या उडत्या शब्दात आणि स्वरात "होय  हो…  इथेच इथेचे" ठोकून दिलं. आणि आमच्या दोघांच्या सुदैवानं bird  फोटोग्राफरची गाडी बाजूने गेली, मी लगेच म्हटलं ते पण तिथेच जातैत बहुतेक. त्या माणसान  मला lift  दिली, आणि मी पण थोडेसे आळोखे-पिळोखे घेतले आणि त्याच्या गाडीत बसलो. त्याच्या बायकोच flight  ४ तास लेट होतं, म्हणून तो timepass  करायला आला होता अशी माहिती प्रवासात कळली. मनात म्हटलं, बायको आली की हा काही BIRDS बघू शकणार नाही  !! तिथे पोचल्यावर एक गोष्ट लगेच ध्यानात येते की अनेक माणसं घोळक्याने फिरतायत. साधारपणे ३-४ माणस प्रत्येकी आणि प्रत्येक घोळक्यात एक ज्ञानी पुरुष, सर्वात महाग लेन्स कॅमेरा असणारा एक इसम आणि ज्याच्याकडे सर्वात भिक्कार दुर्बीण असते असा एक, अस  सर्वसाधारण पृत्थ्करण असत.

पहिल्यावेळी मला अनेक पक्षी ओळखता नाही आले. पण पहिल्या भेटीतच  रोहित पक्ष्यान सोन केल्याने माझी पहिली भेट सफळ झाली, मी खुशीत होतो. तिथून निघाताना मला एकाने कल्याण पर्यंत  लिफ्ट दिली. पण लागलेला वेळ पाहता अस  वाटलं की नाहूर ला सोडलं असत  तर लवकर पोहचलो असतो.
मागाहून मला कोणी तरी सांगितलं  की  त्या भागात हातभट्ट्या आहेत, तेव्हा कॅमेरा असेल तर जपून जा. त्यामुळे उगाचच मला धाडसी सफर करून आलो अस वाटून गेल.

असो, खाली लिहिलेली यादी अपूर्ण आहे, दरवेळी नवीन पक्षी add होतो.

English name                                                  मराठी नावे 

Cormorants                                                  पाणकावळा 
Pond heron                                                    ढोकरी /वंचक 
Kites                                                              घारी 
Kingfishers                                                   खंड्या  आणि बंड्या 
Black wing Stilts                                          शेकाट्या 
Robin                                                            दयाळ 
Munia                                                           मुनिया 
Baya                                                              सुगरीण 
Shrike                                                           खाटिक 
Green Bee eater                                            वेडा  राघू 
Spotted dove                                                 कवडा 
Drongo                                                         भृंगराज 
Sunbirds                                                       सूर्यपक्षी 
Smaller and Greater  Egrets                         बगळे 
Bulbul                                                         बुलबुल (दोन्ही प्रकारचे)
 Parakeet                                                        पोपट 
Sandpiper                                                   तुतवार  

आज वर मला एकदाच दिसलेले पक्षी 
Copper smith barbet                                    तांबट 
Greater coucal                                              भारद्वाज (कोकणात कोकम कावळा म्हणतात)
Eurasian yellow oriole                                 हळद्या 

Brahmney kite                                             ब्राह्मणी घार 

प्रवासी पक्षी 
Flamingo                                                     रोहित 
Spot billed Ducks                                       हळदी कुंकू 
Painted stork                                               चित्रबलाक 




यादी मोठी होईलच, तुम्हाला काही वेगळे दिसले असतील तर तुम्हीही कळवा.
बघू   !!!
दरवेळी वेगळ दिसतं





ता.  क.
माझ्या शुल्लक वेळच्या अनुभवावरून लोकांना माझी एक विनंती आहे
१. त्याचं  कै आहे! साधारणपणे  आपण दुसऱ्याच्या घरात गेल्यावर वाह्यातपणे, मोठमोठ्याने बोलत नाही. हेच किमान पथ्य इथे बाळगाव.
२. अतिउत्साह टाळावा, जमीन दलदलीची आहे
३. कचरा करू नका
४. पक्ष्याच्या उडणारा फोटो हवाय म्हणून त्याला उडवून लावू नका