Sunday, 10 January 2016

डोंबिवली खाडीप्रदेश 

         आज गेली कित्येक वर्ष डोंबिवलीमध्ये राहतोय, पण इतकी जैव विविधता असेल असं  वाटलं  नव्हतं माणसांची नाही बर का, पक्ष्यांची. (माणसं काय इथून तिथून सारखीच). यावेळी उद्युक्त केल फोटोग्राफर विवेक भणगे यांनी. मी माझा नादुरुस्त कॅमेरा घेऊन गेलो त्यांच्याकडे. आणि आमचा नेहमीचा संवाद सुरु झाला.  "लेका … !! आहेस कुठे" , "तू फोटो काढ, मला नको दाखवूस " एवढा बोलून त्यांनी त्यांच्या कडचे फोटो दाखवले. "चल जाऊ कुठे तरी पक्षी बघायला" त्यांनी नेहमीची गळ घातली, मी पण पहिल्या फटक्यातच  म्हणालो "चला उद्याच जाऊ", माझ्या अनपेक्षित उत्तराने जरा बावचळले, पण एकदम खुश झाले. मी म्हटलं  मी पक्षी ओळखेन तुम्ही शूट करा , मी spotter  आणि तुम्ही sniper  अशी विभागणी झाली. सकाळी ७ वाजता कोपरला भेटण्याच ठरलं, माझी सायकल आणि त्यांची बाईक, ठरलं तर मग... सकाळी ७ वाजता जुन्या डोंबिवलीची खाडी. मला एक वाईट सवय आहे, अश्या वेळी ५ मिनिट लवकरच पोहचण्याची. बराच वेळ झाला, माझा भांडूपचा अनुभव गाठीशी असल्याने मला एकूणच अंदाज आला. नंतर असही  वाटलं की  त्यांना कदाचित माझा भरवसा नसावा. इतक्यातच फोन आला "येतोय". एव्हाना मी पोचलो होतो. रविवार सकाळ  होती, डोम्बिवलीकर मोर्निंग walk  ला झुंडीने आले होते. एव्हाना मी कपाळावर हात मारावा इतकी गर्दी झाली होती. झालं कल्याण!! आता कसले पक्षी दिसतायत. विचारातच खाडीवरच्या घाटावर बसलो. आसपास बिअरच्या बाटल्यांचा खच, अर्धवट खाऊन टाकलेला चकना, शेकोटी पेटवता येईल इतकी सिगारेटची थोटकी आणि प्लास्टिक पिशव्या एवढ्या की त्या निसर्गाचा एक भाग वाटाव्यात. "सुसंस्कृत डोंबिवली"ची शोभा होईल असचं एकूण चित्र, "स्वछ भारत" ची एक पंचवार्षिक योजना सहज कामी  येईल. माणसाची मन स्वछ करायची सोय असती तर किती बर्र झाल असतं. असो. 
         एव्हाना माझे फोटोग्राफर मित्र आले होते. त्यांनी माझ्यासाठी एक्स्ट्रा कॅमेरा आणला होता. पुन्हा एकदा "नयनरम्य" परिसर डोळ्याखालून घातला. खाडी शहराच्या पश्चिम टोकाला, उगवता सुर्य मागच्या बाजूला आणि समोर पाणथळ भूभाग, फोटोग्राफी साठी उत्तम सकाळ होती. Spot  billed  duck  चा एक थवा मोठ्या डबक्या कडे जाताना दिसत होता, एक पाण कावळा पंख पसरून उन्हात वाळवत होता. एक stork आणि काही greater  egrets जाताना दिसले, दोन पाच मुनियांचे थवे दिसले.  राखाडी वटवट्या (Ashy Prinia and Plain  Prinia) फांदी वर झोपाळे घेत शीळ घालत होता . 
          बदकं बघण्यासाठी डबक्याकडे जायला निघालो, तशी आमच्या चाहुलीने तो अख्खा थवा भुर्र झाला. २ ३ जागा हुडकून बघितल्या पण दारूच्या बाटल्या आणि सिगारेटी या शिवाय काहीच दिसल नाही. माझे हे मित्र या आधी दोन-तीनदा येउन गेले होते. त्यांनी सुचवलेल्या जागी जायचं ठरलं. वाटेत ४  ५ टीम क्रिकेट खेळत होत्या. अशा ठिकाणी काय दिसणार याच चिंतेत होतो. पण एक कळून चुकलं होतं ही माणस आपल्या आजूबाजूच्या परिसराविषयी अत्यंत बेफिकीर आहेत. यांच्या दुनियेत फक्त २ प्रकारचे पक्षी आहेत, एक कावळा आणि दुसरी चिमणी आणि उरलेले पोपट, मैना वैगेरे.  
        रस्त्याकडेलगत मला एक कोतवाल  (Drongo) दिसला, अत्यंत धीट निघालं ते कार्ट, मी फक्त ६ फूट दूर होतो, हा भाई आरामत बसलेला. एखाद्या model  प्रमाणे सगळ्या angle  ने फोटो काढून घेतले त्याने. येणारे जाणारे "अरे तो कावळा आहे" "काय बावळट  माणूस आहे, कावळ्याचे फोटो काढतोय" अश्या अविर्भावात होते. जिकडे ही मुलं (२५-२६ वर्षाची मुलं ??) क्रिकेट खेळत होती तिकडेच मुनियांचा एक थवा येउन बसला. १५-२० मुनिया सहज असतील, त्यात होत्या काही लाल मुनिया (red adavat). माणसाच्या दुर्लाक्षपणाने का होईना, पण आमच्या वावराला  त्या धिटावल्या होत्या, मस्त फोटो काढता आले. 
         आम्ही ठरलेल्या ठिकाणाकडे जायला निघालो. वाटेत टिटविंच्या (red wattled lapwing) जोड्या दिसल्या, त्या कावळ्यांशी भांडत होत्या. या कावळ्यांनी जगाशी वैर घेतलेलं आहे, म्हणूनच कोकिळेला समस्त पक्ष्यांचा छुपा पाठींबा असावा. जुन्या काळी पावसाचा अंदाज टिटवी अंडी कुठे घालते यावरून काढला जाई. जर उंच पठारावर अंडी असतील तर त्या वर्षी पाऊस चांगला होईल अस भाकीत असे. हल्ली आपण सगळंच सपाट केलंय त्यामुळे अंडी सारखी सखल भागात, म्हणूनच कदाचित पाऊस कमी होत असावा. टिटवीच्या जोडी बरोबर एक पिवळा धोबी पक्षी हिंडत होता (Yellow Wagtail). शेवटी एका ठिकाणी थांबून ज्या पक्ष्यासाठी एवढी तगमग केली होती त्याची वाट पाहत थांबलो. त्यानेही फार वेळ वाट पाह्यला लावलं  नाही. आमच्या समोर एक चिमणीच्या आकाराचा प्रवासी पक्षी येउन बसला. गळ्याभोवती सुंदर निळ्या आणि ब्राऊन रंगांची ३-४ कडी. मराठी मालिकेच्या भाषेत सांगायचं  झालं  तर "जानव्ही टाइप मंगळसूत्र" होत निळ्या आणि ब्राऊन रंगाचं. हे बेन पण फार धिटावलेलं. या पक्ष्याचं मराठी नाव "शंकर" आहे असं एका ठिकाणी वाचलंय, हे कितीपत खरं आहे ते शंकरालाच माहीत. हा जीव पश्चिम अलास्कातून येतो. अशा फारिन पक्ष्याचे पाय माझ्या डोंबिवलीला लागले. धन्य ती डोंबिवली. 
            परतीच्या वाटेवर एका ठिकाणी डबक्यात  मोठे बगळे न्याहारी करण्यात गर्क होते. आणि आज त्यांच्या कडे एक पाहुणा आला होता. तो होता आजवर चित्तमपल्लीन्च्या फक्त पुस्तकात वाचलेला शेराटी.  पण हा होता छोटा शेराटी/ चिमणा कुदळ्या  (Glossy ibis). हा पक्षी उडताना फार सुंदर आणि ग्रेसफुल दिसतो म्हणे, पण म्हणून त्याला उडवून लावलं नाही बर का .  पाणथळ प्रदेशातील पक्षांची यादी ज्यांच्या नावावाचून अपूर्ण राहील असे ढोकरी (Pond heron), तुतवार (Sandpiper) दिसले आणि दिवस संपन्न झाला. घरी पोचेस्तोवर १० वाजले होते. आईने माझे बारा वाजवायच्या आत अंघोळ केलेली बरी. 
           एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या सगळ्या जमिनीवर आधीच छोटे छोटे भूखंड concrete ने  विभागलेले आहेत. ही जमीन कोणाच्या मालकीची आहे माहित नाही. पण लवकरच ती जाईल. आणि अनभिन्य डोम्बिवलीकर या पक्षी संपत्तीला मुकेल अशी भीती उगाचच मला वाटली. असो.  असं  काही तरी होतं याची निदान माझ्या लेखी तरी नोंद झाली.



फोटो सौजन्य: श्री विवेक भणगे (अस्वाम फोटोज्,डोंबिवली)
छोटा शेराटी/ चिमणा कुदळ्या  (Glossy ibis)
Yellow Wagtail
Yellow Wagtail
Blue throat (शंकर)
Plain prinia
Ashy prinia
Blue throat
Blue throat

छोटा शेराटी/ चिमणा कुदळ्या  (Glossy ibis)




Red adavat

Red adavat and Munia
फोटो सौजन्य: श्री विवेक भणगे (अस्वाम फोटोज्)

No comments:

Post a Comment